प्रतिनिधी , जालना- प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका जालन्यातील श्रीकृष्णनगर ग्रामपंचायत निवडणुकीत इच्छूक असलेल्या उमेदवारांना बसला आहे. प्रशासनाकडून ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या आरक्षित प्रवर्गाचा उमेदवारच गावात नसल्याने श्रीकृष्णनगर ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. गावातील वार्ड क्रमांक एक हे एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, असे असताना देखील ऑनलाईन प्रक्रियेत एससी ऐवजी एसटी करण्यात आले आहे. गावात एसटी प्रवर्गाचा एकही रहिवासी नाही.
त्यामुळे ही घोडचूक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अंगलट आली असून राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना या चुकीप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय गावातील निवडणूक देखील रद्द केली आहे .आता निवडणूक रद्द झाल्याने गावातील इच्छुकांनी आणि रहिवाशांनी प्रशासनावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
