जनतेज न्युज

आशा स्वयंसेविकांना बोनस मिळाला पाहिजे या मागणीसाठी कामगार संघटनेचा उपक्रम

प्रतिनिधी, ठाणे : अत्यंत कमी पगार आणि काम बेसुमार, अशीच काहीशी अवस्था आहे आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचे. राज्यात जवळपास ७०,००० आशा स्वयंसेविका तर ४००० गट प्रवर्तक असून कर्तव्य अत्यंत चोख पद्धतीने बजावत असून देखील किमान वेतन आणि बोनस पासून त्यांना वंचित ठेवले गेले आहे. कोरोना काळात या सर्व अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपले परिवार आणि संसाराची पर्वा न करता अत्यंत सचोटीने आणि मेहनतीने काम केले ज्याची नोंद युनो सारख्या जागतिक स्तरावरील संस्थांनी देखील घेतली. परंतु या अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकां विषयी राज्य सरकारे मात्र अत्यंत दुजाभाव करत असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व आशा स्वयंसेविका आणि संघटनेचे निमंत्रक एम ए पाटील यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न लवकरच धसास लावावा अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील याविषयी सकारात्मक भूमिका घेतली परंतु अद्याप त्याच्यावर कोणताही निर्णय न झाल्याने या अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी भाऊबीजेच्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना भाऊबीजेची ओवाळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे काम करून देखील अत्यल्प मोबदला मिळत असल्यानेच आपण हे पाऊल उचलत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.