एमएमआर रिजनमध्ये सुरू होणारे पहिले नाट्यगृह
नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपणार…
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कोरोना लोकडाऊन काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या 9 महिन्यापासून केडीएमसीची सावित्रीबाई फुले आणि आचार्य अत्रे नाट्यगृहं बंद होती. त्यापैकी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा उद्या पुन्हा उघडणार आहे. मुंबई- ठाण्यासह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये सुरू होणार आचार्य अत्रे हे पहिलेच रंगमंदिर ठरणार आहे. तर 20 डिसेंबरला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहं पुन्हा नाट्य रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
कल्याण डोंबिवलीतील नाट्य रसिकांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असून इकडे नाटकांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. नाट्यगृह कधी सुरू होतात याकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या. शासनाने अनलॉकच्या काळात नाट्यगृह सुरू करण्याचे जाहीर केले. तर केडीएमसीनेही नाट्यनिर्मात्यांसाठी 75 टक्के भाडे माफ करण्याचा निर्णय घेत मराठी निर्मात्यांना दिलासा दिला. दरम्यान उद्या आचार्य अत्रे रंगमंदिरात असणाऱ्या पहिल्याच प्रयोगासाठी पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे .शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार स्वच्छता ,आसन व्यवस्थेपासून ते सॅनिटायझर ,सोशल डिस्टनसींगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.
