जनतेज न्युज

कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

प्रथिनिधी, ठाणे :

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात मनुष्यबळ, जेसीबी, पालटून व पोकलेन या मशिनचा वापर करून व्यापक प्रमाणात नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची पाहणी केली. दरम्यान, शहरातील ६५ ते ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून उर्वरित नालेसफाईची कामे ८ ते १० दिवसात पूर्ण करण्याचे आदेश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे महानगपालिकेच्यावतीने यंदा नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाचा पाहणी दौरा करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी ९.०० पासून महापालिका आयुक्त श्री. शर्मा यांनी हिरानंदानी येथून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेवक राम रेपाळे, प्रकाश शिंदे, गुरुमुख्यसिंग स्यान, योगेश जानकर, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त दिनेश तायडे, उप आयुक्त शंकर पाटोळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी हळदेकर, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी हिरानंदानी, ब्रह्मांड पार्क, बटाटा कंपनी, कासारवडवली नाला, कॅशलमिल नाकामी केव्हीला नाला, चंदनवाडी, वागळेप्रभाग समिती, मुलुंड चेक नाका, लोढा, यशस्वी नगर, रोड नं.१६, किसननगर तसेच आयटीआय येथील नाले साफसफाई कामाची पाहणी केली. या सर्व नाल्याची खोली वाढविणे, डेब्रिज उचलणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी संबंधितांना दिल्या.
यंदा पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक उपाययोजना करण्यासोबत नालेसफाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधितांना दिल्या.