प्रतिनिधी , पुणे : श्रावण महिन्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार ह्या गेल्या ४१ वर्षांपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असत. श्रावण महिन्यातील सोमवारी त्या नित्यनेमाने वारी करायच्या. परंतु या यंदा कोरोनाच्या (Corona) साथीमुळे, तर गेल्या वर्षी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यात खंड पडला आहे. त्याबाबतची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत सांगितली आहे.
ही बातमी पण वाचा:- राष्ट्रवादीसाठी दिलासादायक बातमी, पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
त्या वेळी प्रतिभाताई पवार ह्यांच्यासोबत (स्व.) गोविंदराव आदिक यांच्या पत्नी पुष्पलताताई आदिक, सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे याही भीमाशंकराच्या दर्शनासाठी येत असत. या तिघी नित्यनेमाने वारी करायच्या. या त्यांच्या भीमाशंकर वारीमागे एक गोष्ट आहे, ती अशी…
शरद पवार यांनी भीमाशंकर येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी यावे, असा आग्रह आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील (कामगार मंत्री दिलीप वळसे पाटीच यांचे वडील) यांचा होता. त्यांच्या आग्रहास्तव पवार दर्शनासाठी गेले होते. तेव्हा शरद पवार हे राज्याचे उद्योग मंत्री होते. भीमाशंकर अभयारण्यातील टेकवडीवरील वन विभागाच्या विश्राम गृहात पवार यांनी मुक्काम केला होता. त्या वेळी विजेची सोय नव्हती, प्रकाशासाठी कंदील व दिवे होते.
एका खोलीत त्यांची राहण्याची सोय होती. शरद पवारांना रात्री एकच्या सुमारास थोडीशी हालचाल जाणवली; म्हणून ते उठून बसले, तर त्यांच्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला. त्या घटनेमुळे पवार सुन्न झाले. त्यांनी तत्काळ दत्तात्रेय वळसे पाटील यांना हाक मारली. तेही लगेच धावत आले. शरद पवार यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्या वेळी दत्तात्रेय वळसे पाटील आनंदी होत म्हणाले, साहेब, हा तर शुभशकुन आहे. आपण पहाटे भीमांशकरची पूजा करूयात! त्यानुसार पवार यांनी पूजा केली. त्यानंतर शरद पवार मुंबईला परतले. या घटनेनंतर आठ ते दहा दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री झाले. हा किस्सा खुद्द शरद पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितला आहे.
ही गोष्ट जेव्हा प्रतिभाताई पवार यांना समजली, तेव्हापासून गेली ४१ वर्षे त्या श्रावण महिन्यातील एका सोमवारी भीमाशंकरला शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने, तर यंदा कोरोनाची साथ असल्याने मंदिर बंद आहे, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. मागच्या वर्षी वर्षी खासदार सुप्रिया सुळे या दर्शनासाठी आल्या होत्या. त्याबाबतची आठवण त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत सांगितली आहे. तसेच, कोरोनाची ही स्थिती संपली की भीमाशंकरच्या महादेवाचे दर्शन घेईन, असेही सुळे यांनी म्हटले आहे.
