प्रतिनिधी , कोल्हापूर : वेतनासाठी व जिल्हा प्रशासनाच्या अरेरावी विरुद्ध जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार अंगणवाडी सेविकांनी ( Anganwadi workers) शुक्रवारी काम बंद आंदोलन केले. अनेक गावात अंगणवाडी सेविकांनी थाळ्या नाद करत प्रशसनाचा निषेध केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे आणि सुवर्ण तळेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
अंगणवाडी कर्मचारी, आशा, मध्यान्ह भोजन कर्मचारी यांना २१ हजार रुपये अधिक वेतनश्रेणी द्यावी, व किमान १० हजार रुपये पेन्शन द्या, अशी मागणी संघटनांनी केली आहे. महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस याना कोरोना संबंधी काम सांगता येणार नाहीत, असे आदेश असूनही एकात्मिक विकास सेवा योजना आयुक्त यांनी सर्व जिल्हाधिकारी-यांना पत्र लिहून अंगणवाडी सेविका मदतनीस यांना लाभार्थ्यांशी संबंधित कामाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कोरोनाचे काम देऊ नये असे कळवले आहे. उच्च पदास्थांचे मत धाब्यावर बसवून जिल्हा प्रशासन अंगणवाडी सेविका मदतनीस याना कोरोना चे काम सांगत आहे.
विविध स्तरावरील अधिकारी त्याना धमकावत आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीसांचा संपर्कातून लाभार्थी असणारे गरोदर महिला, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील बालके यांच्याशी संपर्क येतो. हे सर्व घटक प्रकृतीच्या नाजूक अवस्थेत असतात. अशा स्थितीत अंगणवाडी कर्मचा-याना कोरोकचे काम सांगण्याची प्रशासनाची ही भूमिका या घटकांना धोका निर्माण करणारी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. वेतन आणि प्रशासनाच्या आरेरारी निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले.
