जनतेज न्युज

दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण

प्रतिनिधी, नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान सुरू असून सिन्नर शहरातून पालखी मिरवल्यानंतर सायंकाळी सुमारास दातली शिवारात खंबाळे रस्त्यावरील मैदानात या पालखीचे पहिले गोल रिंगण संपन्न झाले. यात 46 दिंड्या सहभागी झाल्या असून हजारो वारकरी या पालखी दिंडीत सहभागी आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर ते पंढरपूर येथे निघाले संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण दातली येथे संपन्न झाले. यावेळी गोल रिंगणात सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, विणेकरी क्रमानुसार गोलाकार उभे राहुन विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागले होते. या तालातच भरधाव दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन केले. टाळ-मृदुंगाचा आलाप, विठूनमाचा जयजयकार आणि वेगाने धावणारे अश्व हे सारे विलोभनीय दृश्य बघण्यास मिळाले. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून गेलेले असतात. पुढच्या प्रवासासाठी त्यांना रिंगणातून ऊर्जा मिळते.