प्रतिनिधी, धुळे – राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी ‘हरित शपथ’ घेण्याचा उपक्रम १ ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना हरित शपथ देण्यात आली.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या निर्णयानुसार पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून राज्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘माझी वसुंधरा’ अभियांनांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या आनुषंगाने ‘हरित शपथ’ घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कर्मचाऱ्यांना हरित दिनाची शपथ दिली. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
