प्रतिनिधी , मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला उद्योपती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. कुंद्राने एका प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीचं शारीरिक शोषण केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच पीडित मॉडेलने पोलिसात तक्रार केली तेव्हा तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असाही दावा राम कदम यांनी केला आहे. कदम यांनी आज (30 जुलै) पत्रकार परिषद घेऊन राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.
‘पीडित मॉडेलची जुहू पोलीस ठाण्यात तक्रार’
“14 एप्रिल 2021 रोजी एका प्रसिद्ध मॉडेलने मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या मॉडेलने आपल्या तक्रारीत राज कुंद्राने शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पण ही तक्रार पुढे जाऊ शकली नाही. या तक्रारीवर पुढे कारवाई होऊ शकली नाही. याशिवाय या मॉडेलवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. अभिनेत्रीला तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडायला लावणारे नेमके कोण होते ते आता राज्य सरकारने सांगावं”, असं राम कदम म्हणाले.
