जनतेज न्युज

महापूजेसाठी स्वतः कार चालवत पंढरीच्या वारीला जाणारे उद्धव ठाकरे पहिले मुख्यमंत्री

प्रतिनिधी, मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी निघू शकली नसली तरी यंदाची विठ्ठलाची वारी विशेष ठरली हे नक्कीच. दरवर्षी आषाढी एकादशीची शासकीय पूजा मुख्यमंत्री दांपत्याच्या हस्ते होते. यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेसाठी, विठ्ठल भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्क कारने वारीत सहभागी होत पंढरपुरात पोहचले. होय, वारीच.

कारण यंदा माउलीच्या पादुकादेखील नटूनथटून निघालेल्या एसटी बसने पंढरपुरात पोहचल्या. या वारीसोबतच मुख्यमंत्री ठाकरेंनीही स्वतः कार चालवत पंढरपूर गाठले. आठ-नऊ तासांचा मुंबई – पंढरपूर – मुंबई प्रवास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः कार चालवत पूर्ण केला. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाची पूजा केली. त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही होते.

अशा प्रकारे विठ्ठलाच्या महापूजेसाठी जाणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे विशेष कौतुक होत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विनावाहक गाडी चालवताना दिसतात. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ठाकरे स्वतः कार चालवतात. कोरोनाच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःच गाडी चालवत मंत्रालय आणि इतर भेटींच्या ठिकाणी जाताना दिसून आले.

मंत्रालयात होणाऱ्या बैठकांनाही मुख्यमंत्री स्वतःच गाडी चालवत हजर राहतात. मेमध्ये आमदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळीही ते स्वतः गाडी चालवत असल्याचे बघायला मिळाले.