प्रतिनिधी, मुंबई : तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉक-वन राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र, कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही. तरीही रस्त्यांवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ज्याला रोखण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलिसांनी सोमवारी लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली. दोन हजारांहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले असून, दोन हजार गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
रविवारी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी कलम १८८ अन्वये २ हजार ६१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एका दिवसात ही सर्वाधिक लोकांची नोंद आहे. रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी १ हजार ४६ जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. तर ७०१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा धोका मात्र टळलेला नाही ही बाब नागरिकांनी विसरू नये.
राज्य सरकारने अनेक परवानग्या दिल्या आहेत. कोविड-१९ या महामारीचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे या गोष्टी पाळणं आवश्यक आहे, असं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी हे आवाहन केलं आहे.
मुंबईवर कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. सुरक्षेचे नियम पाळा. राज्य सरकारने जे दिशानिर्देश दिले आहेत त्यांचं पालन करायचं आहे. घराबाहेर फिरताना मास्क लावणं अनिवार्य आहे. मार्केट, शॉप्स, बार्बर शॉप्स सुरू ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. दोन किमीच्या आतच या ठिकाणी जावं असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. व्यायाम करण्यासाठी संमती देण्यात आली आहे. त्यासाठीची मर्यादाही दोन किमीच आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
