जनतेज न्युज

वाई येथील मुलींची शाळा धोकादायक इमारत सांगून पाडून आणली उघड्यावर

प्रतिनिधी , सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील वाई येथे १९८४ सालापासून भाडेतत्वावर सुरू असलेली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची गर्ल्स हायस्कूल ही शाळा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी धोकादायक इमारत म्हणून पाडण्यात आली. यादरम्यान या शाळेतील शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळा पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण संस्थेच्या मुख्याधिपिका रेखा ठोंबरे यांनी केली आहे.
या शाळेत ८ वी ते १० वी पर्यंत मुली शिक्षण घेत आहेत.शाळा पाडल्याने शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि शाळेतील साहित्य रस्त्यावर आल्याचे पाहून मुलींच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
वाईतील ब्रम्हो समाजाकडे या शाळेच्या इमारतीची मालकी असून गेल्या ६५ वर्षांपासून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था वेळेवर भाड्याचा परतावा करत होती. त्याच्या पावत्या देखील शिक्षण संस्थेकडे प्राप्त असल्याचे मुख्याध्यापिका ठोंबरे सांगताहेत.
वाई शहरातील प्रमुख बाजारपेठेत या शाळेची इमारत असल्याने या शाळेला बाहेर काढून त्या ठिकाणी अत्याधुनिक इमारत बांधण्याचा घाट या ब्रम्हो संस्थेचा आहे. त्यामुळे ही शाळा पाडण्यात आल्याचा आरोप मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत ही शाळा पडलेल्या शाळेच्या बाहेरच भरवली जाणार असल्याचा इशारा सर्व शिक्षकांनी दिला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला त्याच्या साताऱ्याच्या भूमीत मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार वाई तालुक्यात घडल्याने या घटनेबद्दल समाजमाध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.