जनतेज न्युज

वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक बसवणारा उत्तर महाराष्ट्रातील धुळे पहिला जिल्हा.

प्रतिनिधी, धुळे : शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टैंक नुकताच दाखल झाला असून आठवडाभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात ऑक्सिजन टैंक बसविण्यात आला आहे. ऑक्सिजन टैंक बसविण्याबाबत पालकमंत्री अब्दुल सतार यांनी जिल्हाधिकारी संजय यादव व अधिष्ठाता डॉ . पल्लवी सापळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार ऑक्सीजन टैंक बसविण्यात आला आहे.
१३ हजार लिटर इतकी ऑक्सिजन टॅकची क्षमता आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील बाधीत रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. कोरोनाचे गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत असतात. या रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. धुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज दररोज ५०० मोठ्या सिलिंडर पर्यंत गेली होती. प्रत्येक १२ तासांनी त्यांचे पुनर्भरण करण्यात येते. ऑक्सिजन टैक बसविल्यानंतर श्रम व पैश्यांची मोठी बचत होणार आहे. ऑक्सिजन टैंक कार्यान्वित झाल्यानंतर कमी मनुष्यबळ लागणार आहे. एकदा टॅकचे पुनर्भरण झाल्यानंतर चार दिवस ऑक्सिजन पुरेल. यापूर्वी जे.जे. रुग्णालय मुंबई, मिरज, बी.जे. रुग्णालय पुणे, सोलापूर व कोल्हापूर येथे ऑक्सिजन टॅक बसविण्यात आले आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात ऑक्सिजन टैंक बसविणारा धुळे हा पहिला जिल्हा असणार आहे.