प्रतिनिधी , हिंगोली : शेतशिवारातील वीज रोबत सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हिंगोलीतील शेतकऱ्यांनी चक्क विद्युत रोहित्राची बँडबाजाच्या गजरात मिरवणूक काढली आहे. हिंगोली तालुक्यातील सवड या गावच्या शिवारातील विद्युत रोहित्र जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके सिंचनाअभावी सुकून चालली होती. महिनाभरानंतर या शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळाले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विद्युत पुरवठा पूर्ववत होऊन शेतीला पाणी मिळणार, या आनंदाच्या भरात सवडच्या शेतकऱ्यांनी चक्क विद्युत रोहित्राची बँड बाजा लावून मिरवणूक काढली आणि विद्यूत रोहित्र बसवले. या अनोख्या वरातीची जिल्हाभरात चर्चा होत आहे.
