लोकप्रतिनिधींचे निवडणुकीनंतर दुर्लक्ष
आत्तापर्यंत एकही सुविधा पोहोचलेली नाही नागरिक जगत आहे हलाखीचे जीवन
प्रतिनिधी, औरंगाबाद : आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. मात्र इथे एक गाव असे आहे की त्या गावापर्यंत अजून महावितरणाचा एकही बल्ब लागलेला नाही. हे गाव आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सतकुंड वस्ती या वस्तीवर अजून पर्यंत महावितरण पोहोचलेले नाही. एवढेच नाही तर जाण्यासाठी रस्ता देखील नाही .भारत हा महासत्ता बनू पाहतोय मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येते. या गावात फक्त महावितरणच नाही तर बाकी मूलभूत सुविधा देखील पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या वस्तीवरील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
औरंगाबाद,सतकुंड वस्ती ही मागासलेल्या लोकांची असून, त्यांच्याकडे आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत. भारताचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवक वर्गाला सुद्धा शिक्षणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाहीत. या सर्व गोष्टी येथील नागरिकांसाठी दुर्दैवच म्हणावे लागेल.
महावितरणची कोणतीही सोय नसल्यामुळे पाणी असून देखील पिकांना पाणी दिल्या जात नाही असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर जनरेटरच्या साह्याने कसेबसे गव्हाचे पीक येथील शेतकरी घेतात परंतु पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे यावर्षी तेही घेणे शक्य झाले नाही. इलेक्ट्रिसिटी नाही आरोग्याच्या सोयी सुविधा नाही तर रस्ते देखील नाही त्यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. या वस्ती वरील लहान मुलांना या वस्तीपासून दीड ते दोन किलोमीटर वर एक वस्तीशाळा आहे तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांना विशेषतः पावसाळ्यामध्ये जीव धोक्यात घालून शाळेमध्ये जावे लागते. लखलखीत आयुष्य जगणाऱ्या आमच्या नेत्यांना या नागरिकांचे अंधारलेले जीवन प्रकाशमय करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.
