जनतेज न्युज

कोरोणाची जनजागृती करीत असताना आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या भारूडरत्न निरंजन भाकरे यांचे निधन, मागील सहा महिन्यापासन ते कोरोना विषयी करीत होते जनजागृती.

प्रतिनिधी , औरंगाबाद : मराठवाड्याचे प्रसिद्ध लोककलावंत भारुडकार निरंजन भाकरे यांचं आज कोविड संसर्गानं निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. बुरगुंडा हे त्यांचं भारुड विशेष लोकप्रिय होतं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या रहिमाबाद नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला होता. भाकरेंच्या भारुडांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. अमेरिकेतल्या शिकागो इथल्या रसिकांनादेखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला मिळाली होती. इंग्लंड या देशात ही त्यांच्या भारुडाचे नियोजन झालेले होते. शिकागो येथे त्यांचे भारुड सादर होणार होते. त्यावेळी मी ” भारुड निघालं अमेरिकेला ” या मथळ्याखाली त्यांची मुलाखत छापली होती. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी ही त्यांनी अनेक जनजागृती चे कार्यक्रम घेतले. तसेच नागरिकांनी लॉकडाऊन काळात घरीच सुरक्षित रहावे यासाठी एका गीताची संगीतमय रचना त्यांनी रचली होती. सोशल मीडियावर या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे यांनी परव्युतर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतल्या विद्यार्थ्यांना भारुडाचं प्रशिक्षणही दिलं. अनेक वाहिन्यांवरील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी परीक्षक म्हणून काम केले. लोककलांचं जतन, संवर्धन व्हावं म्हणून त्यांनी नेहमी धडपड केली. नेत्रदान, रक्तदान आणि देहदान या विषयी त्यांनी समाज बांधवात जनजागृती केली. गेल्या दोन वर्षांपूर्वी वाढदिवसाच्याच दिवशी भाकरे पती पत्नीने मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला होता. भाकरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाला पदमभूषण नामांकन मिळाले होते. महाराष्ट्रातील लोककलेचे जतन व संवर्धन करीत सामाजिक बांधिलकी जपणारे निरंजन भाकरे आज कोरोनाशी झुंज देतांना आमच्यातून अचानक पणे निघून गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मन सुन्न झाले. काळजाला भिडणारी ही घटना आहे.