जनतेज न्युज

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले; संपर्क कार्यालयाचाही अभाव

प्रतिनिधी , यवतमाळ : वनमंत्री संजय राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली. मात्र, ते जिल्ह्यात अपवादाने येतात. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जातात.
संपर्क कार्यालय देखील नाही. शेतकऱ्यांनी समस्यांचे निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून दिल्यास शेतकरी त्यांचे स्वागत करतील, असे मत शेतकरी नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केले.यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त आहे. शेतकरी अनेक संकटात सापडले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, व्यापारी फसवणूक करीत आहेत. पिकविम्याचा लाभ मिळत नाही. पालकच नसल्याने न्याय कुणाकडे मागावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयाकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी जिल्ह्याला पालकमंत्री द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.