प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची या बैठकीला उपस्थिती होती. एखाद-दुसर्या जागेचा अपवाद वगळता बिनविरोध होण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आ. गिरीश महाजन यांनी याप्रसंगी दिली.
जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे चारही पक्ष एकत्रीतपणे लढविणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पद प्रत्येक पक्षाला सव्वा वर्षे मिळेल अशा दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.
सहकारात राजकारण असू नये या भूमिकेतून गेल्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलने जिल्हा बँकेत यश मिळविले. गेल्या पाच वर्षात रोहिणी खडसे यांनी चांगले नेतृत्व केल्यामुळे बँक उर्जीतावस्थेला आली असून आता आगामी निवडणूक देखील सर्वपक्षीय पॅनल करून लढविण्यात येणार आहे ! अशी माहिती आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. अजिंठा विश्रामगृहातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
