प्रतिनिधी , सांगली : सांगली शहरात बगीचे आणि राना शिवारात फुलपाखरांचा बहर आहे. फुलपाखरू हंगाम सुरू झाला असून सांगली परिसरात सुमारे 90 प्रजातींचा आढळल्या आहेत.
पावसाळा सरला की रस्त्याच्या दुतर्फा, शिवारात नानाविध वनस्पती वेलींवर फुले येतात. ओघानेच त्यांच्यांवर अंडी घालण्यासाठी फुलपाखरे येतात. पावसाळा लांबल्याने सध्या सप्टेंबरच्या मध्यानंतर सर्वत्र फुलपाखरांचा वावर दिसत आहे. पुढचे अडीच महिने फुलपाखरांचा बहर असेल. केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे तर सर्वांना ही फुलपाखरे पाहण्याची पर्वणी आहे.
गेली चार वर्षे सांगली परिसरातील आमराई, हरिपूर कृष्णकाठ, शामरावनगर अशा नागरी वस्ती आणि शेत भागात दरवर्षी मोजदाद केली जाते. आत्तापर्यंत या भागात 90 प्रजातींची नोंद झाली आहे. गवताळ, डोंगराळ, जंगल अशा त्या भागातील पर्यावरणानुसार फुलपाखरांचा अधिवास असतो.
देशात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या १५ टक्के म्हणजे सुमारे २२५ प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. सप्टेंबर महिन्यात देशभरात फुलपाखरांच्या प्रजातींची मोजदाद विविध संस्थांच्यावतीने होते.नाजूक आणि निसर्गाच्या विविधरंगी कलाकृतीच असलेली ही फुलपाखरे अल्पायुष्याचा शाप घेऊनच जन्माला आलेली असतात. अवघे दोन एक आठवड्याचे आयुष्य घेऊन आलेली फुलपाखरे निसर्गाच्या जैवविविधतेच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहेत. फुलातला मध खाताना त्यांच्या पायांना चिकटलेल्या पराग कणांमुळे परागीभवन होते आणि याचमुळे निसर्ग संवर्धनाला मोठी मदत होते.
फुलपाखरांचं संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, या साठीच पर्यावरणप्रेमींनी दरवर्षी सप्टेंबर हा महिना फुलपाखरांना समर्पित केला आहे. आपल्याकडे इथून पुढचे साधारण अडीच महिने आपल्या भागात फुलपाखरे आढळतात.
