जनतेज न्युज

१५० खाटांच्या कोरोना हॉस्पिटलचा शुभारंभ

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जालना जिल्हा सज्ज – पालकमंत्री राजेश टोपे

प्रतिनिधी , जालना : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त अशा 150 खाटांची क्षमता असलेल्या व केवळ 29 दिवसांमध्ये उभारणी केलेल्या सुसज्ज रुग्णालयाच्या, सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या व सर्वांच्या सहकार्याने जालना जिल्हा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना हॉस्पिटलचा शुभारंभ फित कापून पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बाधित झालेले दोन रुग्ण आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीकोनातून प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु जिल्ह्यात या विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीकोनातून या दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी 100 खाटा व 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष असून या ठिकाणी 50 व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी अनुभवी व पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच विविध संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी पीपी किट तसेच ट्रीपल मास्क, एन-95 मास्कही उपलब्ध करुन देण्यात आले असून गरजूंना उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या टेलिमेडिसिनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आली असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये व शहरांमध्ये सोडिअम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायजर, मास्क तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची माहिती पुस्तिका यांचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी राज्यस्तरीय प्लॅनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अंबड येथील रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनही निधी मिळण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली. हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर श्री. टोपे यांनी संपूर्ण कोरोना हॉस्पिटलची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.