प्रतिनिधी, कल्याण : अहमदनगर येथे कै . दिलीप गांधी खासदर चषक २०२२ ही राज्यस्तरीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली . या स्पर्धेत ३६ जिल्ह्यांतील सुमारे १४०० खेळाडू सहभागी झाले होते . या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असून १६ सुवर्ण , ४ रजत व ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे . किकबॉक्सींग हा खेळ पॉइंट फाईट , लाईटकॉन्टॅक्ट , किकलाईट , म्युझिकल फॉर्म , फुल कॉन्टॅक्ट , लो किक आणि के १ स्टाईल अशा विविध प्रकारात खेळला जातो . ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनच्या १४ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला व किकबॉक्सींगच्या विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगीरी करीत १६ सुवर्ण , ४ रजत व ३ कांस्य अशा एकूण २३ पदकावर आपले नाव कोरले. यातील हरहुन्नरी खेळाडू दीप जोगल यांने पोइंट फाईट, लाईटकॉन्टॅक्ट, किक लाईट, म्युझिकल फॉर्म या प्रकारात सुवर्ण पदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून सोलस इंडिया असोसीएशनने डॉ. राकेश लुल्ला यांच्या माध्यमातून दीप याला या स्पर्धेसाठी स्कॉलरशिपद्वारे मदत मिळवून दिली आहे. या खेळाडूला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्पर्धेतील इतर पदक विजेत्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी सोलस इंडिया असोसीएशन व पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाना संमांचिन्ह देऊन सर्वांचा गौरव करण्यात आला.
