जनतेज न्युज

जिल्हा रुग्णालयामध्ये किमान एक पोलीस अधिकारी 24 तास उपलब्ध ठेवा- सुप्रदा फातर्पेकर

प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे 24 तास किमान एक अधिकारी तैनात ठेवावा अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्या सुप्रदा फातर्पेकर यांनी केली. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये महिलांच्या समस्यांबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक व त्यांच्या टीमशी श्रीमती फातर्पेकर यांनी चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सोळंखी, गृह विभागाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ. कविता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरतावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहा. पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांच्यासह युवासेना सचिव दुर्गा भोसले, युवासेनेच्या रुची राऊत, जिल्हा महिला आघाडीच्या जान्हवी सावंत तसेच नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.सखी वन स्टॉप सेंटरला पोलीसांच्या मदतीची गरज असेल तेंव्हा तातडीने पोलीस मदत उपलब्ध व्हावी अशी सूचना देऊन श्रीमती फातर्पेकर म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वन स्टॉप सेंटरच्या अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत हवी असते. अशा वेळी घटना आमच्या पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातील नाही म्हणून पोलीस मदत दुसऱ्या पोलीस ठाण्याकडून घेण्याविषयी सांगितले जाते. असे न होता. जे पोलीस ठाणे जवळ असेल तेथून मदत उपलब्ध व्हावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापनेमध्ये मग ती शासकीय असो वा खासगी, अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन होण्याच्या दृष्टीने जिल्ह महिला व बाल विकास विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्या सुप्रदा फातर्पेकर यांनी आज दिल्या. नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये त्यांनी महिला विषयक योजना व प्रकरणे यांचा आढावा घेतला. त्यावेळी श्रीमती फातर्पेकर बोलत होत्या.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, युवासेना सचिव दुर्गा भोसले, शिवसेनेच्या जिल्हा माहिला प्रमुख जान्हवी सावंत, युवासेना विस्तारच्या रुची राऊत, पोलीस उपअधिक्षक डॉ. सोळंखी, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.जी.काटकर, प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमोल पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्याम पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळचे नितीन काळे, बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते.प्रत्येक महिलेने आपल्या अधिकाराबाबत जागृक रहावे असे सांगून श्रीमती फातर्पेकर म्हणाल्या की, महिलाच महिलांचे प्रश्न संस्थांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. एक चांगली महिला शक्ती या जिल्ह्यात पहायला मिळते. या महिला शक्तीने महिला आयोगासोबत एक टिम म्हणून काम करावे. सखी वन स्टॉप सेंटरसाठी एक वाहन सीआरएसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी अभय केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर, अंतर्गत तक्रार निवारण समिती, तृतीयपंथीयांच्या समस्या यासह महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. गुन्ह्यांमधील वैद्यकीय तपासणीसाठी वेळ लागतो. त्यासाठी वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर कशी करता येईल हे पहावे. बस डेपोच्या ठिकाणी पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त घालावी. बालकांबाबतच्या गुन्ह्यांबाबत जागृती करावी. सिंधुदुर्ग पोलीस विभाग चांगले काम करत आहे. गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगले आहे. महिलांबाबच्या गुन्ह्यांचे प्रमाण सिंधुदुर्गमध्ये कमी आहे, ही चांगली बाब असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी श्रीमती फातर्पेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे सुरू असलेला कक्षाचे तसेच रेल्वे स्थानकावर पहाटे तसेच रात्रीच्या वेळी येणाऱ्या एकट्या महिलांना मदत पुरवण्याचे काम याचे कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील गुन्ह्यांची व त्यांच्या तपासाची सविस्तर माहिती ही त्यांनी घेतली.