जनतेज न्युज

शेतकरी कन्या स्नेहाला मिळाले 95.50 टक्के गुण.

प्रतिनिधी, यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्घतीने जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेच्या निकालात यवतमाळ येथील जगदंबा विज्ञान विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा जाधव हिने 95.50 टक्के गुण मिळवित बाजी मारली आहे. स्नेहाचे वडील दुर्योधन जाधव शेतकरी आहेत. त्यांच्याकडे आर्णी तालुक्यातील आंजी (ना.) येथे सहा एकर शेती आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी यवतमाळ गाठले. स्नेहाची मोठी बहीण चेतना नागपूर येथे उच्चशिक्षण घेत आहे. तर, लहान भावाने दहावीची परीक्षा दिली आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचं असून, ग्रामीण भागात सेवा देण्याची इच्छा आहे. बारावीच्या निकालानंतर तिची नीट परीक्षेची तयारी सुरू आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शिक्षक व मार्गदर्शकांना देते. स्नेहाच्या यशाने जाधव परिवारात आनंदाची लाट आली आहे.