जनतेज न्युज

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ धुळ्यात शिवसैनिक रस्त्यावर

प्रतिनिधी, धुळे : राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. धुळ्यात देखील धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिकांची मध्यवर्ती कार्यालयात प्राथमिक बैठक घेऊन शिवसैनिकांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घेऊन घोषणाबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहरातील महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळे शिवसेना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली वाढलेली आणि ज्वलंत हिंदुत्वावर ठाम असलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे, आमच्या सारखे कडवट कट्टर शिवसैनिक आजही मुख्यमंत्री पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे कोणी गेले तरी शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिल. असा विश्वास आज धुळ्यात शिवसैनिकांनी एकत्र येत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसेनेचा इतिहास संघर्षाचा असून याआधीही शिवसेनेला दगाफटका झालाआहे, मात्र शिवसेना कधीही बिथरली नाही यातून भक्कमपणे उभी राहून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना लढत आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण यानुसार आज वर शिवसेनेचे काम सुरू आहे. शिवसेनेने ज्या लोकांना मोठे केले तीच लोक पक्षविरोधी भूमिका घेत आहेत, मात्र तळागाळातला स्वाभिमानी शिवसैनिक या सर्वांचा निषेध करतो मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व शिवसैनिक उभे राहतील व आम्ही शिवसेना कधीही सोडणार नाही अशी ग्वाही यावेळी शिवसेना शिवसैनिकांनी दिली आहे.