जनतेज न्युज

आरक्षण सोडतीला एकही महिला उपस्थित नसने ही शोकांतिका

प्रतिनिधी, बुलढाणा : पूर्वीच्या काळी चूल आणि मूल या चौकटीतच महिलांचं आयुष्य होत, मात्र जश्या महिलांना संधी मिळत गेल्या तसेच त्यांनी स्व:ताच्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व दाखवून दिले, स्वतःला सिद्ध केल आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत, नव्हे तर एक वेगळी ओळख देखील निर्माण करत आहेत आणि त्यामुळे स्त्री पुरुष समानतेचा गाजावाजा करत महिलांचे आरक्षण वाढवून पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के आरक्षण दिलं, मात्र राजकीय क्षेत्रातला विचार केला, तर केवळ मोजक्या महिला वगळता, केवळ राजकीय आरक्षण आहे म्हणूनच महिलांना संधी दिली जाते, आणि त्यातही त्यांचा कार्यभार हे पती देवच सांभाळत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.नेमका हाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यात पाहायला मिळाला. बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये जिल्हाभरातून विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने या आरक्षण सोडत कार्यक्रमाला उपस्थित होते.ज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या संहितेनुसार आरक्षण सोडत कार्यक्रम शांततेत पार पडला, यावेळी महिलांना 50 टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या परंतु एक अचंबित करणारी बाब निदर्शनास आली. ती म्हणजे महिलांना 50 टक्के आरक्षण असूनही या आरक्षण सोडत कार्यक्रमाला एकही महिला उपस्थित नव्हती, ही शोकांतिका तर आहेच , सोबत याच चित्रांमुळे स्त्री-पुरुष समानतेचा बुरखाही फाटला. केवळ महिलांना संबंधित पद आरक्षित आहे म्हणून पर्यायाने महिलेला त्या जागेवर उभं केल जात. मात्र खऱ्या अर्थाने ती केवळ नाममात्र असते.अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा पूर्णपणे निघाला असे म्हणता येणार नाही.त्यामुळे महिला खरंच पूर्णपणे स्वतंत्र झाल्यात का..? हा एक चिंतन करायला लावणारा प्रश्नच आहे.