प्रतिनिधी, मुंबई : सध्या इंधनाच्या दरवाढीवरून काँग्रेस अधिकच आक्रमक झाली असून, आज आंदोलनही केले. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला इंधनावरील लावलेला अधिभार कमी केल्यास इंधनाचे दर कमी होतील असा सल्ला दिला आहे.
इंधनाचा जीएसटीत समावेश नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो. आताच्या सरकारने अर्थसंकल्पात एक रूपया अधिभार आणि १ जूनपासून २ रूपयांची वाढ अशी ३ रूपये वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सरकारी नियंत्रणातून काँग्रेसनेच मुक्त केले. २०१८ मध्ये जेव्हा अशाच प्रकारची दरवाढ झाली, तेव्हा ४ ऑक्टोबर २०१८ रोजी ५ रूपयांचा दिलासा राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. अशी आठवणही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
