प्रतिनिधी, ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलावर तुळई बसविली जाणार आहे. या कामामुळे शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ वाजतापर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कोपरी पूलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मुख्य पूलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून शनिवारपासून सोमवारपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर तुळई बसविली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद ठेवली जाणार असून येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ वाजतापर्यंत आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.
प्रवेश बंद – नाशिक मुंबई महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा महापे मार्गे रबाळे-ऐरोली पूल येथून मुंबईत इच्छित स्थळी जातील.
