प्रतिनिधी, बुलडाणा : रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचे निर्देश दिले आहे.. राष्ट्रीयकृत बँकांनी तयारी देखील केली आहे, पण मुहूर्ताच्या पहिल्या दिवशी ग्राहकांनी नोटा जमा करण्यास फारसे स्वारस्य दाखविले नाही.. जिल्ह्यातीलही मोठी बँक असलेल्या स्टेट बँक सह अन्य बँकातही असेच ग्राहकांचे निरुत्साही व काळजीमुक्त चित्र दिसून आले आहे. तर जिल्ह्यात स्टेट बँकेच्या 54 शाखा असून 51 शाखांमध्ये आर्थिक व्यवहार होतात. याशिवाय सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, विदर्भ ग्रामीण आदी बँकांचे जाळे आहे. सर्वाधिक उलाढाल, व्यवहार होणाऱ्या एसबीआयने 2 हजारांच्या नोटा स्वीकारण्यासाठी जय्यत नियोजन केले आहे. मागील अनुभव लक्षात घेता मोठ्या संख्येने ग्राहक येतील ही अपेक्षा बँक अधिकार्यांना आहे. नोटा परत करण्यासाठी असलेली ३० सप्टेंबर २०२३ ही मुदत याचे एक कारण असल्याचे दिसून आले. दरम्यान ग्राहक स्वहस्ते २ हजारांच्या 20 नोटा एकाच वेळी जमा करू शकतात. त्यासाठी कोणताही अर्ज भरायचे आणि आधार, केवायसीचे बंधन नसल्याचे स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सिद्धार्थ पवार यांनी सांगितले आहे. ग्राहक दररोज सुद्धा नोटा जमा करू शकतात. तसेच ग्राहक आपल्या खात्यात २ हजार नोटांच्या रुपात कितीही नोटा जमा करू शकतो. अशी महत्वपूर्ण माहितीही पवार यांनी दिली.
