जनतेज न्युज

‘बकरी ईद’ निमित्त मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या रक्तदान सप्ताहाला सुरुवात

प्रतिनिधी , पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि समविचारी संघटनांच्यावतीने ‘बकरी ईद'(Bakra Eid)निमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात विविध भागात १ ते ७ ऑगस्टदरम्यान सकाळी ११ ते २ यावेळेत हे शिबीर सुरु राहणार आहे.

पुण्यात सानेगुरुजी स्मारक, पर्वती पायथा येथे आयोजित या शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिराला तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने या शिबिराच्या आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, राष्ट्र सेवा दल आणि इतर समविचारी संघटनांच्यावतीने दरवर्षी बकरी ईद निमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले जाते. सध्याच्या करोनाच्या संकट काळात गेल्या चार महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्याची कसरही या रक्तदान सप्ताहाने भरुन निघण्यास मदत होणार आहे.

करोनाच्या(Coronavirus) पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क, हातात ग्लोव्ह्ज, फेस मास्क अशा सुरक्षा उपकरणांचा वापर करीत रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांकडून हे शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरासाठी बीव्हीजीचेही सहकार्य लाभले आहे.