जनतेज न्युज

मृत्यू मुंब्र्यात…..नातेवाईकांचा गोंधळ कळवा रुग्णालयात..

प्रतिनिधी, ठाणे : दूध आणण्यासाठी घराबाहेर निघालेल्या ३० वर्षीय व्यक्तीचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा येथील सैनिक नगर परिसरात घडली आहे. रवी चौहान असे मृत व्यक्तीचे नाव असून पोल वरील टोरेंट कम्पनीची विद्युतवाहिनी रस्त्यावर उघड्यावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.मुंब्रा, सैनिक नगर येथील बंजारा वस्तीत राहत असलेला रवी हा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी निघाला आणि उघड्यावर पडलेल्या विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर विद्युत वाहिनी पोल हा टोरंट कंपनीचा असून या कंपनीच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा परिसरात विद्युत पुरवठा केला जातो. या टोरंट कंपनीच्या पोलवरील वायर महिन्यातून दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे उघड्यावर पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी टोरंट कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सदर तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अकस्मात मृत्यूची नोंद करत रवीचा मृत्यदेह कळवा येथील छ. शिवाजी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला..त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तसेच स्थानिकांनी थेट कळवा रुग्णालय गाठत त्या ठिकाणी जोरदार आंदोलन केलं…मुंब्र्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील यावेळी सहभागी होत आक्रमक झाले होते..या सर्वांनी रुग्णालयात ठिय्या देत दोषींवर कारवाई आणि मृताच्या नातेवाईकांना मदत देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..यावेळी पोलिसानी संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांना  आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांची पोलिसांशी थोडी झटापट झाली मात्र तात्काळ पोलिसांनी सौम्य बाळाचा वापर करत स्थानिकांना पांगवले…