जनतेज न्युज

देऊळ बंद च्या विरोधात ५ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथे साधु-संतांचे बेमुदत धरणे आंदोलन – आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांची घोषणा

प्रतिनिधी , तुळजापूर : देऊळ बंद च्या विरोधात ५ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथे साधु-संतांचे बेमुदत धरणे आंदोलन – आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांची घोषणा
१ नोव्हेंबर पर्यंत मंदिरे उघडण्याच्या मागणीला राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिरे उघडण्यास सरकार परवानगी देईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे , अशी घोषणा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आचार्य भोसले यांनी म्हटले आहे की , महामहिम राज्यपाल महोदयांना भेटून आध्यात्मिक समन्वय आघाडी ने राज्य सरकारकडे १ नोव्हेंबर पर्यंत मंदिरे उघडा अशी मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तसेच साधु- संतांच्या शिष्टमंडळाशी चर्चा देखील केली नाही. राज्यातील भाविक जनतेच्या भावनांपेक्षा ठाकरे सरकारला आपला अहंकार जपायचा आहे. त्यामुळे आता राज्यातील भाविक जनता मंदिरांवर लावलेले अन्याय आणि अहंकाराचे टाळे तोडून मंदिरे उघडणे सुरु करणार आहे. परंतु, सर्वच मोठी देवस्थाने की ज्यांच्यावर लाखो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे, अशी देवस्थाने राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत. त्याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेऊन देव-भक्तांच्या आड येण्याचे पाप हे हिरण्यकश्यिपू राज्य सरकार करत आहे.
या विरोधात आध्यात्मिक समन्वय आघाडी गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार असून मंदिरे उघडण्याची घोषणा होत नाही आणि आम्हाला आई तुळजाभवानी मातेचे दर्शन होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे घेणार नाही, अशी घोषणा आचार्य तुषार भोसले यांनी केली. आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साधु,संत ,धर्माचार्य आंदोलन करतील. या आंदोलनात सर्व धार्मिक-आध्यात्मिक संघटना, स्थानिक व्यावसायिक, तसेच सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांनाही सहभागी होण्याचे आवाहन आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे करण्यात आले आहे.