प्रतिनिधी , अमरावती : दिवाळी तोंडावर आली तरीही एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन, भत्ते आणि सण उचल मिळाली नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे एसटी कामगारांनी घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले. यामध्ये पगार न देणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.
एसटी कामगारांना दर महिन्याला सात तारखेला वेतन देण्यात येते. परंतु सध्या ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्याप दिलेले नाही. कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्याची मागणी केली आहे. तसेच सण उचल दिवाळीपूर्वी देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. परंतु दिवाळी तोंडावर आली तरीही अद्याप तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. २ नोव्हेंबरला एसटी कामगार संघटनेच्यावतीने सगळीकडे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कायदेशीर तरतुदीनुसार वेतन नियमित तारखेला दिले नाही. महागाई भत्ता व सण उचलही दिली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांवर उधारीची वेळ आली आहे. संघटनेने २ नोव्हेंबरला निवेदन देऊन ९ नोव्हेंबरला कुटुंबासह आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह आंदोलन केले. एसटी कामगारांची दिवाळी अंधारात न होता याची शासनाने दखल घेऊन दिवाळी गोड करावी ही प्रामाणिक इच्छा असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले.
