घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करू या
प्रतिनिधी, चंद्रपूर : यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका, खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे.
यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातील. परंतु, शोभायात्रांचे आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा,घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नका. बत्ताश्यांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईल, अशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
