जनतेज न्युज

महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर गेल्या आठवडाभरापासून २३ ते २६ च्या संख्येत तरुण सारसांचा समूह तळ ठोकून आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर ‘सारस संमेलन’
प्रतिनिधी , गोंदिया : प्रेमाचे प्रतिक असलेल्या राज्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सारस पक्ष्यांच्या संमेलनाने सारस संवर्धकांमध्ये नवी उभारी आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर गेल्या आठवडाभरापासून २३ ते २६ च्या संख्येत तरुण सारसांचा समूह तळ ठोकून आहे.त्यामुळे सारसाचं संमेलन पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी एकच गर्दी केली आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात १९७० साली पक्षीप्रेमींनी सारस पक्ष्यांचे संमेलन अनुभवले. त्यानंतर सारसांची संख्या राज्यातून झपाटय़ाने घसरली. तेव्हा काही सेवा संस्थेने सारस संवर्धनाची धुरा हाती घेतल्यानंतर राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ात ते टिकून राहिले. संवर्धनाचे फलित म्हणजे तब्बल ४४ वर्षांनी फे ब्रुवारी २०१४ मध्ये सारसाचे संमेलन घडून आले. यावेळी २३ ते २४च्या संख्येत सारस एकत्रित आले होते. तीन वर्षांनी २०१७-१८ मध्ये पुन्हा एकदा असेच घडले. आता पुन्हा  दोन ते तीन वर्षांनी या दोन्ही राज्याच्या सीमेवर सारस गोळा झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून कधी २३ तर कधी २६ च्या संख्येत ते दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व सारस तरुण असून अंदाजे दोन वर्षे वयाचे आहेत. यातील केवळ तीन ते चारच सारस प्रौढ आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी काही पक्षीप्रेमी प्रयत्न करीत आहे.
संवर्धनाच्या दिशेने पक्षीप्रेमींनी उचललेल्या पावलाला वनखात्यानेही साथ दिली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत सारसांची घरटी संरक्षित होत असून त्यातून होणारे प्रजनन यशस्वी होत आहे.  यंदाच्या सारस संमेलनात २६ सारस पक्षी एकत्रच असून उर्वरित चार ते पाच सारस त्यांना अधूनमधून येऊन भेटत आहेत.