जनतेज न्युज

उदरनिर्वाहासाठी बांधकाम कामगारांना प्रत्येकी १० हजारांची मदत द्या; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे राज्यभरातील उद्योगधंदे, शेती आणि बांधकाम क्षेत्रातील कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न आता कामगारांना पडला आहे. मात्र आता कामगारांच्या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे.
मनसेच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे नोंदणीकृत प्रत्येक कामगाराला प्रत्येकी दहा हजार रुपये तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
बांधकाम व्यवसाय बंद झाला आहे. महाराष्ट्रात बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांवर तसेच त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. महाराष्ट्रात कामगार खाते व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे या कामगारांची नोंद आहे. २० लाख असे कामगार आहेत. ती नोंदसुद्धा अपुरी आहे. विशेषतः मुंबईच्या कामगारांची बिल्डरच्या धमकावण्यामुळे व कामगार खात्याच्या निष्क्रियतेमुळे नोंद अत्यंत अपुरी झालेली आहे.

या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ८००० कोटी रुपये जमा आहेत. ते कामगारांचे हक्काचे पैसे आहेत. आताच्या कोरोना संकटामुळे आलेल्या बेकारीला व उपासमारीला तोंड देण्यासाठी नोंदणीकृत प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १० हजार रुपये तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.