प्रतिनिधी , पनवेल : पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाजवळील जंगलात व डोंगराळ भागात दोन व्यक्तींकडे बिबट्या वाघाची नखे व कातडी असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस नाईक सचिन टिके यांना मिळाली त्या अनुषंगाने मोरबे धरण परिसरात पोलिसांनी सापळा लावून पाळत ठेवली होती .3 डिसेंबरला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्हटकर व सपोनि निलेश तांबे व त्यांच्या पथकाने मोरबे धरणाजवळील भल्याची वाडी पासून दोन किलोमीटर असलेल्या डोंगराळ भागात असलेल्या एका झोपडी मध्ये असणाऱ्या गणपत पालकू लोभी(२६)व गणपत राघू वाघ (५५) या पालेखुर्द मध्ये राहणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे बिबट्या वाघाचे कातडे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता,दिड महिन्यांपूर्वी जंगलात मृत पावलेल्या बिबट्या वाघाचे कातडे त्यांनी चाकूच्या साह्याने काढल्यावर कबुली दिली या दोघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. बिबटयाची चार नखे आरोपींच्या घरातून हस्तगत करण्यात आली असून, उर्वरित नखे व जबडा व इतर अवशेष यांचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे।
