जनतेज न्युज

सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथील चापें परिवाराच्या वतीने आईची रक्षा तीर्थक्षेत्रावर नेण्याऐवजी त्यात केले वृक्षारोपण.

उत्तर कार्यासाठी लागणारा खर्चही दिला गावातील मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.
प्रतिनिधी , औरंगाबाद : समाजात व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्या जातो. रक्षा , दहावे , उत्तरकार्य अशा अनेक प्रथा आजही समाजात पाळल्या जाते . मात्र या सर्व प्रथेला फाटा देत सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथील चापे परिवाराने आईच्या निधनानंतर आईची रक्षा तीर्थक्षेत्रावर नेण्याऐवजी शेतात एक खड्डा करून या रक्षेत वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. शिवाय उत्तर कार्य न करता उत्तर कार्यासाठी लागणारा खर्च म्हणून 51 हजार रुपये नीराधार तसेच गावातील अर्धवट राहिलेल्या मंदिराच्या बांधकामासाठी दान करण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे तसेच पुंडलिकराव चापे यांच्या मातोश्री सुपडाबाई चापे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवार रोजी त्यांचा रक्षेचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त चापे यांच्या अन्वी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी महसूल तसा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती.
चापे परिवाराने अंत्यविधीसाठी लागणारा नाहक खर्च टाळून यातून एक सामाजिक आदर्श समाजापुढे आणला आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. समाजातील अनावश्यक प्रथा व त्यावर होणारा खर्च टाळला पाहिजे यासाठी समाजातील सुशिक्षितांनी पुढे येवून समाजात परिवर्तन घडविले पाहिजे, ही काळाची गरज असल्याचे मत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच चापे परिवाराने आईच्या रक्षेमध्ये केलेल्या वृक्षारोपणातुन आईची सावली आयुष्यात कायम सोबत राहील असे भावोद्गार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले