प्रतिनिधी , औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोनाच्या संकट काळातही सिल्लोडच्या ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा निधी दिला. ना. अब्दुल सत्तार यांच्याकडेच ग्रामविकास खाते असल्याने आपल्या विचारांच्या जर ग्रामपंचायती असेल तर गावांचा सर्वांगिण विकास होण्यास वेळ लागणार नाही हे मतदारांना समजावून सांगा. तसेच पॅनल उभे करीत असताना शिवसेनेचा विचार आणि विकासाचे ध्येय असणाऱ्या लोकांचा त्यात समावेश करा, आपापसातील वाद, गट, बाजूला ठेवून कामाला लागा . आपापल्यातच दोन पॅनल तयार झाले तर तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सिल्लोड तालुक्यातील 83 पैकी 83 ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी आजच निर्धार करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सिल्लोड येथे केले.
बुधवार रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करीत असताना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी बोलत होते.
