प्रतिनिधी , मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्क न वापरल्यास संबंधित भा.दं.वि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कारण, मुंबईत अनेक हॉटस्पॉट तयार झाले आहेत.
वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्याने चालताना, रुग्णालयात अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक करण्यात आलं आहे. याशिवाय वाहन चालवताना, सरकारी बैठकांमध्येही मास्क वापरणे अनिवार्य आहे.
