प्रतिनिधी , ठाणे : एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मुळपदावर येत असतांनाच ठाण्यात तब्बल चौदा पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूच्या शंकेने हाहाकार उडाला आहे. घटना आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलातील, जिथे आज मॉर्निंग वॉक साठी आलेल्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे बगळे मेलेले आढळून आले. अनेक पक्षी एकाच वेळी मृत सापडल्याने काहीतरी गंभीर कारण असल्याचे त्यांना जाणवले. नागरिकांनी एकत्र येत हे पक्षी गोळा केले तर तब्बल 14 पॉंड हेरॉन जातीचे बगळे मृत झालेले आढळून आले. साधारणतः पाणवठ्याच्या आसपास हे पक्षी आढळून येतात व उंच झाडांवर आपली घरटी बनवतात. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून सर्व राज्यांना सतर्ककतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील अनेक शहरात अनेक पक्षी अचानक मृत्यमुखी पडले असून यामागे बर्ड फ्लूचे विषाणू असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे अधिकृत माहिती नसल्याने सदरचे सर्व पक्षी कशामुळे मेले यावर उलटसुलट चर्चाना उधाण aale आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदरचे मृत पक्षी ताब्यात घेतले असून मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बर्ड फ्लू आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी यामुळेच पक्षांना पुण्याच्या डीसीस इन्वेस्टीगेशन एजन्सीकडे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
