प्रतिनिधी , ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कल्याण-डोबिंवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. इथे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, ट्रॅकिंग हा फॉर्म्युला औषधाला सापडत नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर केली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आज आणखी सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४९वर पोहचली आहे. यामध्ये २५ डोंबिवली पूर्व, ७ डोंबिवली पश्चिम, ९ कल्याण पूर्व, ७ कल्याण पश्चिम तर टिटवाळ्याचा १ रुग्ण आहे. यापैकी ८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
