जनतेज न्युज

विलगीकरण केंद्राजवळ जावून मरण्यापेक्षा, सिव्हिलमध्ये मेलेलो बरे संतप्त रहिवाशांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी , ठाणे :- ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालय पूर्णतः कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे रुग्णालयाच्या आवारात असलेली सफाई कर्मचार्यांची चाळ हलविण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र, या रहीवाशांना भाईंदर पाडा येथे पालिकेच्यावतीने कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राच्या बाजूच्या इमारतीती घरे देण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच विलगीकरण केंद्राजवळ जावून मरण्यापेक्षा सिव्हिलमध्ये राहून मरू अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांचा आकडा वाढत आहे. त्यात मुंबईतील रुग्णालयावर ताण येत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी राज्यात इतर 30 ठिकाणी कोरोना रुग्णालय सुरु करावेत असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आता ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील दीडशे रुग्णांना महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच सफाई कामगारांची 90 वर्षे जुनी चाळ आहे. आता कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता ही चाळ हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याठिकाणी राहणाऱ्या सफाई कामगारांना किंवा त्यांच्या घरच्यांना याची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या सर्वाचे घोडबंदर भागातील ब्रम्हाड भागात स्थलांतर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, या संदर्भात कर्मचार्यांना आपले स्थलांतर कुठे होणार आहे, तसेच आपल्याला राहण्यासाठी कुठे घरे मिळणार याबाबत स्पष्टता नसल्यामुळे कर्मचार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यात शुक्रवारी सकाळी त्यांना भाईंदर पाडा येथे घरे देण्यात येणार असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर काही कर्मचारी घरे पाहण्यासाठी गेले असता, ज्या इमारतीत त्यांना घरे देण्यात आली आहे. त्याच इमारतीच्या बाजूच्या विंग मध्ये ठाणे महानगर पालिकेचे कोरोनाबाधित रुग्णांसाठीचे विलगीकरण केंद्र तयार केले असल्याचे निदर्शनास येवून सध्याच्या घडीला त्या इमारतीत संशयित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांची या रहिवाशी कर्मचार्यांनी जावून भेट घेवून संताप व्यक्त केला. तसेच ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देत आहात. त्या ठिकाणी देखील विलगीकरण केंद्र आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्र जवळ रहायला जावून मरण्यापेक्षा सिव्हीलमध्ये राहून मेलेलो बरे अशी संतप्त प्रतिक्रिया येथील कर्मचारी व रहिवाशांमधून व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.