प्रतिनिधी , मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागातील भाजीपाला, कांदा-बटाटा तसेच धान्य पुरवठा सुरळीत राहावा म्हणून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ची घाऊक बाजारपेठ बुधवार, १५ एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मसाले तसेच फळ बाजाराबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
एपीएमसी व्यवस्थापनाने माथाडी कामगार, व्यापारी तसेच वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी याबाबत केलेली चर्चा यशस्वी ठरली. कांदा-बटाटा तसेच भाजी मार्केटमधील सर्व व्यवहार १५ एप्रिलापासून पूर्ववत करण्याबाबत सर्वांनीच तयारी दर्शविली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तसेच मार्केट यार्डमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने वाशी मार्केट शनिवारपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातील भाजीपाला तसेच कांदा- बटाटाट्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती होती.
बाजार सुरू करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापन सर्व संबंधितांशी चर्चा करत होते. ही चर्चा यशस्वी ठरली आहे. या अनुशंगाने नियमावलीलाही अंतिम रूप देण्यात येत आहे, असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.
एपीएमसीतील व्यापारी आणि कामगारांनी बंदची घोषणा केली त्याच दिवशी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही भाजी मंडई, फळबाजार बंद करण्याचे आदेश जारी केले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा बंदीआदेश लागू करण्यात आला. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील सर्वच महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीत सध्या भाजी बाजार बंद आहेत. तेथील नागरिकांची गैरसोय होते आहे.
