प्रतिनिधी , पंढरपूर : राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीवरून आता रान पेटत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीज बिल माफ करावे आणि वीज तोडणी बंद करावी यामागणी कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वतः च्या शरीरावर चाबकाचे फटके मारून अनोखे आंदोलन केलंय.
दुष्काळग्रस्त सांगोल्यात मनसे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हे आंदोलन सुरू झाले. छत्रपती शिवाजी चौक ते महावितरण कार्यालय असे दोन किलोमीटर चाबकाचे फटके मारून घेत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राज्य सरकारने वीज ग्राहकांची फसवणूक केल्याचा सुरू यावेळी दिलीप धोत्रे यांनी केला. सरकारने वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी आणि वीज बिल माफ करावे अन्यथा प्रसंगी कायदा मोडून आंदोलन करण्याचा इशारा धोत्रे यांनी दिला.
याबाबतचे निवेदन वीज वितरण कंपनीला देण्यात आले.
