प्रतिनिधी, मुंबई : पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात एका घरात घुसून 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लंपास केली आहे. रात्री तीन च्या सुमारास अज्ञात चोर घरावर चढून घराची कौले काढून आत प्रवेश केला, ज्या स्वयंपाक घरात कपाट होते तो कपाट फोडून त्यात असणारे 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास दीड लाखांची रोकड चोरटयांनी लुटली असल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. चोरी झालेल्या घरात मसाला चक्की आणि दुग्ध व्यवसाय असल्याने नेहमीच रोकड असते, त्याचप्रमाणे गणपती सणात वापरलेले सोन्याचे दागिने कपाटातच होते. या सगळ्या वस्तूंवर चोरटयांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे जमवलेली सर्व संपत्ती गेल्याने घरातील महिलांना रडू कोसळले. पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला तात्काळ भेट देऊन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
