जनतेज न्युज

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शेतकरी महिलांच्या अभ्यास दौऱ्याला सुरुवात

प्रतिनिधी , औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकरी महिलांचा अभ्यास दौरा सुरू झाला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व मार्गदर्शनातून सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील १५१ शेतकरी महिला अभ्यास दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून या दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अभ्यास दौऱ्यातील शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतात काम करतात. त्यामुळे पुरुषांप्रमाणे शेतकरी महिलांना देखील आधुनिक शेतीचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतकरी महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी करता यावी यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. नैसर्गिक शेती, शेती पूरक व्यवसाय, कलम बांधणीचे नर्सरी प्रात्यक्षिक, कुकुट-शेळी पालन, एकात्मिक शेती प्रकल्प, गोड्या व निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन व मत्स्य संवर्धन अशा विविध विषयाच्या अनुषंगाने या दौऱ्यात महिलांना अभ्यास करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा महत्त्वाचा असून लवकरच हा प्रयोग राज्यभर राबविण्याचा निर्णय घेणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. कायगाव ग्रामपंचायतिच्या वतीने १५ वा वित्त आयोग २०२१ – २२ मधील महिला व बालकल्याणअंतर्गत शेतकरी महिलांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. राळेगण सिद्धी , हिवरे बाजार , राहुरी कृषी विद्यापिठ , बारामती , दापोली , कोकण कृषी विद्यापीठ , तुळजापुर , पंढरपुर , कोल्हापूर , जेजुरी या ठिकाणी जाऊन शेतकरी महिला प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पाहणार आहेत.