जनतेज न्युज

परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून वायरल करणाऱ्या आरोपीला अटक

प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वरून अनेक परिक्षार्थीचे हॉल तिकीट अवैधरित्या डाउनलोड करून ते टेलीग्राम चॅनेलवर बेकायदेशीररित्या प्रसारीत करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई सायबर पोलीसांनी अटक केले आहे. रोहित कांबळे या 19 वर्षीय तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर टाकलेल्या बाह्य लिंक मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून तब्बल 94,000 परीक्षार्थिंचे हॉल तिकीट प्राप्त करुन “MPSC 2023 A” या टेलीग्राम चॅनेलवर बेकायदेशीर रित्या प्रसारीत केले होते. नवी मुंबई सायबर पोलीसांनी गुन्हा करताना वापरलेला आय. पी. ॲड्रेस शोधून काढत तांत्रिक माहितीच्या आधारे रोहित कांबळे याला, पुणे येथून अटक केले आहे. सायबर पोलीसांनी आरोपीच्या राहत्या घरातून गुन्हयात वापरलेला 1 डेस्कटॉप, 1 लॅपटॉप, 3 मोबाईल फोन आणि 1 इंटरनेट राउटर देखील हस्तगत केलाय. सदर गुन्ह्यांची कबुली रोहित कांबळे या आरोपीने दिली असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.