जनतेज न्युज

माजी महापौर मनोहर सपाटेंवर अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी, सोलापूर : संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा, नैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला ही विधवा होती. त्यावेळी तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत आरोपी सपाटे यांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन. तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, असे सांगत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. शिवाय तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेही गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणत तक्रार मागे घेण्यास सांगितले. तिची इच्छा नसतानाही तिच्याकडून राजीनामा लिहून घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या तक्रारीवरून माजी महापौर, राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.