जनतेज न्युज

संतापजनक; आई-वडील एचआयव्ही बाधित; मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेश नाकारला

प्रतिनिधी, बीड :  आई-वडील एचआयव्ही बाधित म्हणून निगेटिव्ह मुलाला प्री प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रवेश नाकारल्याचा संतापजनक प्रकार बीडच्या पाली येथे समोर आलाय. त्यामूळे एचआयव्ही बाधितांच्या पाल्यांच्या वाट्याला तोच वनवास आला आहे.इंग्लिश स्कूलमध्ये आपला मुलगा शिकावा, यासाठी आई आणि वडील दोघांनी प्रयत्न केले. अखेर पाली येथील परिवर्तन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. फी भरली दीड महिना शाळेने शिकवले मात्र अचानक शाळेत पाठवू नका अस संगितल्याचा आरोप पीडित आईने केला. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पाठवता आलं नाही याची खंत देखील बोलून दाखवली.
 
 
एचआयव्हीबाधित आई-वडिलांच्या समाजाकडून मुलाला दिली गेलेली वागणूक हीनकस आहे. पाच वर्षाच्या मुलाचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातो हे दुर्दैव आहे. असं मत इन्फट इंडिया प्रकल्पाचे संचालक दत्ता बारजगे यांनी व्यक्त केले.
 
 
यासंदर्भात परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या संचालक आणि शिक्षकांना विचारणा केली असता आम्ही मुलाला कोणतीही हिन वागणूक दिली नाही. याचे फोटो विडिओ आमच्याकडे आहेत. मात्र पालक आक्रमक झाल्यामुळे तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाहीत. असा पवित्रा त्यांनी घेतला म्हणून शासन आणि प्रशासनाने मदत करावी मागणी शाळेचे संचालक अशोक शिंदे यांनी केली..
 
 
घडलेल्या प्रकारा संदर्भात बीडचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना विचारले असता प्री प्रायमरी स्कूल ही खाजगी आहे. त्याला कुठलीही मान्यता दिली जात नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आम्ही सूचना दिली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गावातील पालक भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवत नाहीत. म्हणून संस्थाचालक देखील अडचणीत आहेत. तर मुलाला शिक्षण मिळावं म्हणून एचआयव्ही बाधित पालक देखील आग्रही आहेत. या वादात एचआयव्ही संदर्भात कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य विभाग कागदोपत्री जनजागृती करत आहे. माञ प्रत्यक्ष लोकांचे गैरसमज दूर झाले नाहीत. म्हणून जनजागृती कमी पडत असल्याच यावरून दिसून येत आहे.