जनतेज न्युज

शेतात पडली वीज;गोठा जळून खाक ; परसोडी येथील घटना

प्रतिनिधी, वर्धा : मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु असतानाच ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अशातच आर्वी तालुक्याच्या परसोडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज पडल्याने शेतातील गोठा पूर्णत: जळून खाक झाला. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मोहनसिंग पंढरे यांचे परसोडी शिवारात शेत आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून संपूर्ण पिके पाण्याने खरडून गेली आहे. अशातच त्यांच्या शेतात दुपारच्या सुमारास वीज पडल्याने शेतात असलेल्या गोठ्याला आग लागून गोठ्यात असलेले तीन ते चार वाहनातून आणलेले कुटार, बासे तसेच इतर शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात शेतकरी मोहनसिंग यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.